“हळूच दबकत दबकत म्हणायचं दादा,दादा होईल का पुढं काही”; पुन्हा शरद पवारांसोबत एकत्र येणार का? अजित पवारांचे स्पष्ट उत्तर
Authored by जयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Mar 2024, 3:30 pm
Ajit Pawar: शिरूर येथे पक्षाच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांच्या मनातील शंका दूर करत स्पष्टपणे सांगितले की, आपण आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार नाही.
अमोल कोल्हेंचा राजकारण हा पिंडच नाही, अजित पवारांनी चूक कबूल केली
शिरुर: शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदारांसह महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या काही महिन्यात अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर अनेकदा टीका देखील केली. इतक नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ देखील मिळवले. राज्याच्या राजकारणात इतक्या सर्व घडामोडी घडून देखील दबक्या आवाजात चर्चा होत असते की शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का? या प्रश्नाचे उत्तर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
मेळाव्यात बोलताना शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर हल्ला चढवताना अजित पवार यांनी शरद पवारांसोबत एकत्र येणार का यावर स्पष्ट उत्तर दिले. २०१९ साली मीच कोल्हे यांना मतं द्या असे सांगितले होते. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही आता मनात कोणतीही वेगळी भावना आणू नका. आता सरळ सरळ फाटा पडल्या आहेत. आपण इकडच्या बाजूला आणि ते तिकडच्या बाजूला आहेत.
काही जण म्हणत्यात ही कधी एकत्र येतील का रं…यांनीच आमचं निम्म गार होतंय.हळूच दबकत दबकत विचारायचे दादा पुढे काही होईल का? म्हणजे लोकांच्या मनात अजून ही तशा प्रकारची शंका आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो असं काही होणार नाही, असे अजितदादा म्हणाले.
अमोल कोल्हेंबाबत केला गौप्यस्फोट
यावेळी अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मीच त्यांना दुसऱ्या पक्षातून आणले पक्षात प्रवेश दिला, तिकीट दिले आणि निवडूण देखील आणले. पण दोन वर्षातच ते राजीनामा देणार होते. राजकारण हा अमोल कोल्हेंचा पिंडच नाही.