जमुई: पाकिस्तानमधील सीमापार दहशतवादाला प्रभावीपणे तोंड देण्यात पूर्वीच्या काँग्रेस सरकारांना अपयश आल्याचा आरोप गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच यामुळे भारत हे ‘दुर्बल’ लक्ष्य असल्याचा समज निर्माण झाला, असेही मोदी म्हणाले.

बिहारमधील जमुई येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी ‘इंडिया’चा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एकमेकांना तुरुंगवासात पाठवण्याची भाषा करणारे सर्व मोदीविरुद्ध एकत्र आले आहेत.’

ते म्हणाले, ‘आज एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासारखे (राजद) पक्ष आहेत, ज्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात जगभरात देशाचे नाव खराब केले, तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आहे, ज्यांचे उद्दिष्ट भारताचा विकास करणे आणि कार्यक्षम बिहार निर्माण करणे हे आहे.’

मोदी यावेळी म्हणाले, ‘दहा वर्षांपूर्वी भारताबद्दल काय मत होते ते तुम्हाला आठवत असेल. काँग्रेस राजवटीत भारत हा दुर्बल देश मानला जात होता. आज पिठासाठी तळमळणारे लहान देशांमधील दहशतवादी आपल्यावर हल्ला करून निघून जातात आणि तरीही काँग्रेस तक्रारी घेऊन इतर देशांत जात असते. मात्र आजचा भारत हा महान पाटलीपुत्र आणि मगधचा देश असल्याने हे चालणार नाही, असे मोदी म्हणाले. ते म्हणाले की, भारत चंद्रगुप्त मौर्याचा ‘भारत’ आहे. तो आज घरात घुसून मारतो. आजचा भारत जगाला दिशा दाखवतो. अवघ्या दहा वर्षांत भारताची प्रतिष्ठा आणि दर्जा कसा वाढला हे आता जग पाहत आहे.’

भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून, चांद्रयान आणि तिरंगा, चंद्राच्या त्या कोपऱ्यात पोहोचले आहेत जिथे आजवर कोणीही पोहोचले नव्हते, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी ‘इंडिया’चा खरपूस समाचार घेतला. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकमेकांच्या तुरुंगवासाची मागणी केली. मात्र आज मोदीना हरवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. ‘भ्रष्टाचाऱ्यांनी तुरुंगात नसावे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मी म्हणतो भ्रष्टाचारी हटाव, ते म्हणतात मोदींना हटाव’, असेही मोदी म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला विरोध करत असलेल्या काँग्रेस-राजद युतीवरही त्यांनी टीका केली. ज्येष्ठ ओबीसी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याला आणि दलित रामनाथ कोविंद आणि आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी विरोध केल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.

जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी घोटाळ्याचा संदर्भ देत त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर उपरोधिक टीका केली. नितीश बाबूदेखील रेल्वेमंत्री होते, पण त्यांची कारकीर्द निर्दोष होती, असे ते म्हणाले.

जातगणनेबाबत पंतप्रधानांचे म्हणणे काय?

नवी दिल्ली : बिहारमधील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या जातनिहाय गणनेबद्दल पंतप्रधानांनी त्यांना काय वाटते, ते सांगावे, असा प्रश्न काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. बिहारमधील जमुई येथे पंतप्रधान मोदींची जाहीर सभा गुरुवारी झाली. तत्पूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर हा प्रश्न विचारला होता. ‘सन २००६मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कायदा रद्द करणारे बिहार हे पहिले राज्य आहे. परंतु हा निर्णय अपयशी ठरला. हा निर्णय अयशस्वी होऊनही, मोदी सरकारने तीन काळ्या कृषिकायद्यांद्वारे देशभरातील एपीएमसी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आता ते शेतकऱ्यांना एमएसपी हमीपासून वंचित ठेवत आहेत,’ असे रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एपीएमसी मॉडेल हटवल्याने बिहारच्या शेतकऱ्यांना काय फायदा झाला आणि ते राष्ट्रीय स्तरावर हे मॉडेल लागू करण्याचा प्रयत्न का करत आहेत?, हे पंतप्रधान स्पष्ट करू शकतील का, असा प्रश्न त्यांनी पंतप्रधानांना केला.

जयकृष्ण नायर

जयकृष्ण नायर यांच्याविषयी

जयकृष्ण नायर

जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.… Read More

Read More