मतदानाची टक्केवारी वाढली कशी? अनिल देशमुखांना वाढलेल्या आकडेवारीवर शंका
Edited byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स 3 May 2024, 6:18 am
Anil Deshmukh : मतदानाच्या टक्केवारीत वाढ करून निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काही घोळ तर करीत नाही ना? डिजिटल युगात मतदानाचा टक्का वाढलाच कसा, असे सवाल देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या दिवशी टक्केवारीत वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाने तब्बल ११ दिवसांनी जाहीर केले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘डिजिटल भारतात निवडणूक आयोगाकडून ही चूक झाली का? मतदानाच्या टक्केवारीत वाढ करून निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काही घोळ तर करीत नाही ना? डिजिटल युगात मतदानाचा टक्का वाढलाच कसा,’ असे सवाल देशमुख यांनी उपस्थित केले आहेत. यापूर्वी निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशीच रात्री उशिरापर्यंत एकूण टक्केवारी किती झाली, याची माहिती प्रसिद्ध करीत होते. यात प्रामुख्याने किती मतदार होते आणि किती मतदारांनी मतदान केले, यासह टक्केवारी जाहीर करीत होते. लोकसभेच्या महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून १३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे. त्या वेळी सायंकाळी सातपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरी ५९.५६ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगानेच आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले होते; परंतु आता यात वाढ करून या तेराही मतदारसंघांतील अंतिम आकडेवारी ही ६२.७१ टक्के जाहीर करण्यात आली. साधारणत: ३.०८ टक्के यात वाढ दाखविण्यात आली.
नागपूर वगळता सर्वच ठिकाणी टक्केवारीत वाढ दाखविण्यात आली आहे. चंद्रपूर येथे तर सुरुवातीला ६०.३५ असलेली टक्केवारी ही ७.२० टक्क्यांनी वाढवून ती ६७.५५ दाखविण्यात आली आहे. असाच प्रकार महारष्ट्रात पहिल्या व दुसऱ्या टप्यात झालेल्या तेराही मतदारसंघांत दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या टक्केवारीमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगावर केंद्रातील सरकारचा दबाव असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. यात आता हा टक्केवारीचा घोळ समोर आला आहे. निवडणूक आयोगाने भाजपचे उमेदवार विजयी करण्यासाठी तर हा घोळ तर केला नाही ना, असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.